Akola news:अकोट तालुक्यात लोतखेड येथे मर्डर…
रिपोर्ट:मोहम्मद जुनेद
Akola:अकोट तालुक्यातील लोतखेड येथे आज संध्याकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान झालेल्या फायरींग मध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविण्यात आले आहे. अकोट तालुक्यातील दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोतखेड या दोनशे ते तीनशे लोकसंख्या असलेल्या छोट्याश्या गावात आज सायंकाळी कदिर शहा नामक इसमाने फिरोज पठाण वर पिस्तुलातून अगदी जवळून गोळ्या झाडल्या त्यातच फिरोज पठाणला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला अकोल्याला उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे.कदिर शहा हा भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेला असून तो व फिरोज पठाण हे दोघेही गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या समोर एकमेकांच्या शेजारी रहात असून त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून जागेबाबत वाद सुरु असल्याची चर्चा असून यासाठी दोघांनीही दहीहंडा पोलीस स्टेशनला एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या असल्याचे सुद्धा चर्चेतून उघड होत आहे.आज सायंकाळी दोघेही गावातील गावातील मस्जिद मध्ये नमाज अदा करण्यासाठी जात असतानाच आपसांत काहीतरी वाद झाला आणि लगेच कदिरने खिशातून पिस्तुल काढून फिरोज पठाणवर गोळ्या झाडल्या.त्यातच फिरोज खाली कोसळला.
गोळीबाराच्या आवाजाने लगेच गावकरी गोळा झालेत आणि लगेच फिरोजला उपचारासाठी अकोल्याला रवाना करण्यात आले.सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच फिरोजचा मृत्यू झाला असल्याचे निदान डॉक्टरांनी केले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.दरम्यानच्या काळात दहीहंडा पोलिसांनी तातडीने सूत्रे फिरवून गोळीबार करणाऱ्या कदिर शाह याला गावातून अटक केली असल्याची माहिती प्राप्त झाली असून सद्यस्थितीत गावात शांतता आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती मिळताच लोतखेडला घटनास्थळ गाठून पुढील कारवाईची सूत्रे आपल्या हातात घेतली असल्याचे समजते.अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व अकोटच्या उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर घटनास्थळी उपस्थित असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.