कराड येथील गोरक्षणाची जागा बळकावण्यासाठी कार्यरत असणाऱ्या शासनाच्या विरोधात लाक्षणिक उपोषण

रिपोर्ट:पियूष प्रकाश गोर

कराड, ६ मे (वार्ता.) – येथील गोप्रेमी तसेच परिसरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या भाजी मंडई येथील गोरक्षण केंद्राची जागा बळकावण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून दबाव तंत्राचा वापर करीत कराड नगरपरिषदने गोप्रेमी तसेच परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावनांना पायदळी तुडवण्याचे काम आरंभीले आहे. याच्या विरोधात गोरक्षण बचाव समितीच्या वतीने सोमवार, दिनांक ८ मे या दिवशी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत येथील तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक दिवसाचे लक्षणीय उपोषण करण्यात येणार आहे.काल शुक्रवार, दिनांक ५ मे या दिवशी गोरक्षण संस्थेस कोणतेही पूर्वकल्पना, विश्वासात न घेता गोरक्षण केंद्राची शासकीय मोजणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. गेल्या शंभर वर्षांपासून या ठिकाणी गोपालनाचे काम करण्यात येत आहे. कत्तलीसाठी नेहण्यात येणाऱ्या गाई, भेकड जनावरांची गोरक्षकांनी सुटका केल्यानंतर या ठिकाणी असलेल्या गोरक्षण केंद्रात अशा गाईंचे संगोपन करण्यात येते. सध्या या ठिकाणी तीसहून अधिक गाईंना सांभाळ करण्यात येत आहे. या ठिकाणी पुरातन असे श्रीकृष्ण मंदिर देखील आहे. परिसरातील गोप्रेमी तसेच हिंदू बांधव सण-उत्सव तसेच धार्मिक कार्यासाठी या ठिकाणी येऊन गोग्रास देत असतात. सध्या या जागेच्या वादावरून कोर्टात केस दाखल आहे.एकीकडे स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणविणारे महाराष्ट्र सरकार गाईच्या संगोपनासाठी आयोग नेमत असताना या ठिकाणी मात्र गाईंचा निवारा काढून घेण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने केला जात आहे. कराड नगरपरिषद तथा शासनाच्या या दडपशाहीच्या विरोधात गोरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या लाक्षणिक उपोषणास गोप्रेमी तसेच शहरातील सुजान नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन गोरक्षण बचाव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button