Akola news:जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला मोठा प्रतिसाद,रानभाज्यांना शाश्वत बाजारपेठ मिळणे आवश्यक,जिल्हाधिकारी अजित कुंभार

महराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद

अकोला, दि. १२ :
रसायनविरहित आणि औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. या भाज्या सर्वदूर पोहचण्यासाठी शाश्वत बाजारपेठ उपलब्ध झाल्यास शेतकरी बांधव व बचत गटांना फायदा होईल. जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

कृषी विभाग, ‘आत्मा’ व डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मा कार्यालय परिसरात आयोजित जिल्हा रानभाजी महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार अमोल मिटकरी, उपवनसंरक्षक कुमार स्वामी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, विलास वाशिमकर, संध्या करवा, मिलिंद जंजाळ, विजय शेगोकार आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, धावपळीच्या आजच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेह, ओबेसिटीसारखे आजार वाढले. उत्तम आरोग्यासाठी आहारात रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे. निसर्गाने वनस्पतींची भरभरून समृद्धी आपल्याला दिली आहे. त्याचे आहारातील महत्त्व ओळखले पाहिजे. जिल्ह्यात केंद्र व राज्य कृषी योजनांची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

आमदार श्री. मिटकरी म्हणाले की, आहारात ‘फास्ट फूड’चा वापर वाढल्याने मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात केला पाहिजे. निरामय जीवनशैलीसाठी निसर्गाशी नाते जोडणे आवश्यक आहे. रानभाज्या सर्वदूर पोहचण्यासाठी विपणन साखळी निर्माण व्हावी. प्रशासनाने त्यासाठी सहकार्य करावे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही याबाबत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महोत्सवात जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव, महिला बचत गट सहभागी झाले होते. गुळवेल, तरोटा, करटूले, वाघाटे, तांदुळजा, हडसन, केणा, अंबाडी, चिवळ, करवंद आदी विविध भाज्या व वनस्पतींचा, तसेच विविध खाद्यपदार्थांचा महोत्सवात समावेश होता.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी महोत्सवातील प्रत्येक कक्षाला भेट देऊन रानभाज्यांची माहिती जाणून घेतली, तसेच शेतकरी बांधव व बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधला.

रानभाज्यांची ओळख करून देणाऱ्या पुस्तक व घडीपुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. शशिकिरण जांभरूनकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button