दक्षिणेत पृथ्वीराजबाबा आणि अतुलबाबांची रणनीती कराड दक्षिण विधानसभा निवडणूक; प्रचारात येणार रंगत, दोन्हीकडील कार्यकर्ते चार्ज
कराड / प्रतिनिधी : –विद्या मोरे
राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. त्यानुसार कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आपापली रणनीती आखायला सुरुवात केली आहे.
विंग, ता. कराड येथून धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. तर भाजपचे लोकसभा प्रभारी, सरचिटणीस डॉ. अतुलबाबा भोसले हे दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर वडगाव हवेली, ता. कराड येथून आपल्या प्रचाराची तुतारी फुंकणार आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यावर प्रचाराचा धुरळा उडणार असून या निवडणुकीत खरी रंगत येणार आहे.
या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण आणि डॉ. अतुल भोसले यांच्यातच थेट लढत होणार आहे. त्यामुळे एकंदरीत काँग्रेस पक्ष म्हणून दक्षिणेत मतांचा मतगठ्ठा आहे. तो एकत्र ठेवण्यासाठी रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली अन्यायाची भावना दूर करत काँग्रेसच्या या दोन्ही गटांत एकदिली राखण्याचे पृथ्वीराज चव्हाण यांच्यापुढे आव्हान आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये डॉ. अतुल भोसले यांचे वाढणारे वर्चस्व पाहता त्यांना अंतर्गत विरोध करणाऱ्या भाजपच्याच अन्य गटांमध्ये अद्याप धुसफूस क्षमवण्याचे मोठे आव्हान डॉ. अतुल भोसले यांच्यापुढेही उभा आहे.
दिवाळीनंतर खरा प्रचाराचा धुरळा उडणार असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे मोठे रंगत निर्माण होणार आहे. त्यामुळे दोन्हीकडे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच चार्ज झाल्याचे दिसून येत आहे.
कराड शहरात अतुलबाबांचा शिरकाव
भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांनी कराड शहरात चांगलाच शिरकाव केला आहे. शहरातील विविध भागात त्यांच्या कोपरा सभा आणि कार्यकर्ते बैठकींना उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे कराड शहरातून डॉ. अतुल भोसले यांना चांगली मदत मिळणार असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.
ग्रामीण भागात बाबांची एन्ट्री
कराड दक्षिणमधील गावागावात, तसेच वाडी – वस्तीवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बाबांची एन्ट्री त्यांच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा सध्या ग्रामीण भागातील जनतेत सुरू आहे.