Akola news:निरक्षर व्यक्तींच्या सर्वेक्षणाच्या कार्यातून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सूट द्या- सौ. संगिताताई शिंदे
सौ. संगीताताई शिंदे यांची शिक्षण संचालक यांना मागणी; शिक्षण संचालकांना केला मेल
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरीता सर्वेक्षणासाठी अन्य पर्यायी व्यवस्था करा
महाराष्ट्र अकोला मोहम्मद जुनैद
नव साक्षरता कार्यक्रम अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या गावनिहाय निरक्षर व्यक्तींच्या सर्वेक्षणाच्या कार्यातून राज्यातील प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सूट द्या व सर्वेक्षणासाठी अन्य पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा सौ. संगीताताई शिंदे यांनी शिक्षण संचालक यांना केली आहे याबाबत त्यांनी शिक्षण संचालक, पुणे यांना ई- मेल केला आहे. शिक्षण संचालक पुणे यांच्या काल 28 ऑगस्ट रोजीच्या पत्रानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणासह जनगणना 2011 च्या प्राप्त आकडेवारी नुसार गावनिहाय 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींच्या नावासह प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याची जबाबदारी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. हे सर्वेक्षणाचे काम शिक्षकांना शाळा भरण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत करावयाचे आहे असे सदर पत्रामध्ये नमूद केले आहे.त्यातच शिक्षक भरती बंद असल्यामुळे अनेक शाळांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत.अशा परिस्थितीत निरक्षर व्यक्तींच्या सर्वेक्षणाचेही काम शिक्षकांवर सोपविल्यास त्याचा परिणाम अध्ययन- अध्यापनावर होईल व शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त बोजा वाढेल.शिक्षक जर हेच काम करीत राहिले तर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. हे टाळण्यासाठी नव भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत निरक्षर व्यक्तींच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे कामातून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना सूट द्या व निरक्षर व्यक्तींच्या सर्वेक्षणासाठी अन्य पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी सौ. संगीताताई शिंदे यांनी केली आहे.