पिंपळगाव (हरे.) येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रा, त्रिवेणी संगमावर हेमाडपंथी मंदिर

आबा सूर्यवंशी

(जळगाव जिल्हा प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने हरेश्वर मंदिर परिसरात भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेले हे पाचशे वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून यात्रेदरम्यान हजारो भाविक दर्शनासाठी येतात.
यात्रेच्या पूर्वसंध्येला आडगाव (ता. एरंडोल) येथील मानुदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाची भव्य पायी दिंडी पिंपळगावकडे प्रस्थान करते. या यात्रेत औरंगाबाद जिल्ह्यातील शिल्लोड, कन्नड, सोयगाव तसेच पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा आदी तालुक्यांतून मोठ्या संख्येने भक्त सहभागी होतात.
*हरेश्वर नावाला पौराणिक आधार*
मंदिराच्या आख्यायिकेनुसार येथे भगवान शिव आणि विष्णू यांचे प्रतीक असलेले शिवलिंग असून, त्याच्या विशेष रचनेमुळे या ठिकाणाला “हरेश्वर” हे नाव प्राप्त झाले आहे. याशिवाय, पुराणकथेनुसार येथे भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून भस्मासुराचा वध केला होता, अशी मान्यता आहे.
*यात्रे निमित्त पंधरा दिवस बाजार*
महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने पंधरा दिवस बाजार भरतो. यात संसारोपयोगी वस्तू, खेळणी, मिठाईची दुकाने यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होते. यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याशिवाय, पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेवाचे), भडगाव रोडवरील शिवमंदिर, हिवरा नदीकिनारी व वाणेगाव-निंभोरी येथील महादेव मंदिरांमध्येही महाशिवरात्री निमित्त मोठ्या भक्तिभावाने पूजन व विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Related Articles

Back to top button