पाचोऱ्यात पोलीस ठाण्यासह पोलिस निवासस्थानांच्या कामाचे भूमिपूजन

Bhoomipujan of police residences including police station in Pachoriyat

आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी) पाचोरा शहरातील भडगावरोड वरील पोलीस लाईन येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन पोलीस स्टेशन आणि अधिकारी- पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी राजेशसिंग चंदिले, तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, आदी उपस्थित होते.
*२१ कोटींच्या निधीतून सुविधा*
आमदार किशोर पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पोलिसांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्राधान्य आहे. याच उद्देशाने मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने २१ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन पोलीस स्टेशनसह अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभारली जाणार असून, यामुळे पोलिसांचे राहणीमान सुधारण्यास मदत होईल.
*पोलिसांसाठी आधुनिक सुविधा*
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, पाचोऱ्यातील पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसह ४८ पोलीस कर्मचारी, २ पीआय दर्जाचे अधिकारी आणि १ पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी निवासस्थानांची उभारणी केली जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस हाऊसिंगकडे सुमारे ३५०-४०० प्रस्ताव होते, त्यात पाचोऱ्याची निवड झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुन्हेगारी नियंत्रणावर भर
आमदार किशोर पाटील यांनी नगरदेवळा, कजगाव आणि कोळगाव येथे नवीन पोलीस ठाण्यांची गरज असल्याचे सांगत, यासाठी त्वरित प्रस्ताव तयार करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाला केले. तसेच, भडगाव पोलीस ठाण्याच्या नूतनीकरणासाठी देखील प्रयत्न करण्याचे आमदार श्री. पाटील यांनी आश्वासन दिले. पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.

Related Articles

Back to top button