अवैध गौणखनिज उत्खनन ; महसूल विभागाच्या कार्यवाहीत जेसीबी जप्त,तहसीलदार श्री.बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली धडक
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधि) पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु. येथे गिरणानदी पात्रात अवैध गौणखनिज उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने तातडीने धडक कारवाई करत जेसीबी (एक्सकॅव्हेटर) जप्त केले.
दिनांक ११ मार्च रोजी दुपारी वाजता महसूल विभागाला माहिती मिळाली की, अंतुर्ली खु. गावातील नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी जेसीबी उतरत आहे. महसूल पथक घटनास्थळी पोहोचताच वाळूचोर जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन नदीच्या पलीकडे पळाले. मात्र ग्राम महसूल अधिकारी ललित पाटील यांनी धाडसाने पाण्यातच जेसीबी पकडले .पळून जाण्याच्या प्रयत्नात जेसीबी खडकावर आदळल्याने बंद पडले व त्यातून तेल सांडू लागले. सदर वाहन दुर्गेश भाऊसाहेब पाटील (रा. अंतुर्ली खु.) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या वाहनाला तहसील कार्यालयात जमा करण्यास दुर्गेश पाटील यांनी विरोध केला आणि महसूल पथकाला अडवण्याचा प्रयत्न केला.विरोधाला न जुमानता महसूल अधिकाऱ्याने जेसिबी बाहेर काढण्यासाठी पाचोरा व खडकदेवळा येथून यंत्रे मागविली आणि रात्री उशिरा जेसीबी बाहेर काढण्यात यश आले. मात्र रात्री अज्ञात चोरट्यांनी मशीनचे बॅटरी, डिझेल व तेल चोरून वायरिंग तोडल्याने ते अधिक खराब झाले. या प्रकारामुळे महसूल आवारातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सदर कार्यवाही तहसीलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आर. डी. पाटील, महेंद्र पाटील, विजय येवले, कीर्ती चौधरी, ग्राम महसूल अधिकारी ललित पाटील, पोलिस अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांचा महत्त्वाचा सहभाग राहिला. गौणखनिज चोरी प्रकरणी महसूल विभाग दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे समजते!.