पाचोरा येथे लोक न्यायालयात १०५८ प्रकरणांचा निपटारा!, ४ कोटी १८ लाख ४१ हजार रुपयांची वसुली
आबा सूर्यवंशी
(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
पाचोरा न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती, पाचोरा व पाचोरा तालुका विधिज्ञ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ मार्च रोजी विधी सेवा समितीचे प्र.अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क स्तर जी. एस बोरा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या लोक न्यायालयात दिवाणी न्यायाधीश जी बी औंधकर, सह दिवाणी न्यायाधीश एस व्ही निमसे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १६६ इतकी प्रकरणे निकाली काढून त्यात २ कोटी ४ लाख १४ हजार ५८३ रुपये इतकी वसुली झाली. तसेच वादपूर्व ८९२ प्रकरणांचा निपटारा होवून यात २ कोटी १४ लाख २६ हजार ८९२ रुपये इतकी रक्कम वसुल झाली आहे. एकूण४ कोटी १८ लाख ४१ हजार ४७५ रुपये इतकी रक्कम वसूल झाली आहे. यावेळी दहा वर्षे जुने चार दिवाणी दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले.
तसेच व्हर्च्युअल पद्धतीने दोन तर कौंटूंबिक वाद मधील वीस प्रकरणे निकाली निघाले. यावेळी पॅनल प्रमुख म्हणून श्रीमती जी एस बोरा तसेच पंच सदस्य म्हणून श्रीमती ललिता पाटील यांनी कामकाज पाहिले. सदर लोक न्यायालय यशस्वी करण्याकरिता पाचोरा न्यायालयातील सर्व वरिष्ठ, कनिष्ठ विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, बँक अधिकारी, कर्मचारी, बी.एस.एन.एल. अधिकारी, कर्मचारी, वीज महावितरण अधिकारी, कर्मचारी, पाचोरा व पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलीस स्टेशन अधिकारी, कर्मचारी तथा न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक, कर्मचारी यांनी सहकार्य केले. लोकन्यायालयात पक्षकार आपल्या प्रकरणांमध्ये तडजोड करून घेण्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.