गुटखा तस्कर तुरुंगात ; तरी गुटखा विक्री सुरूच, पाचोरा – भडगाव तालुक्यात विमल गुटखा सप्लायर सक्रिय! अचानक विमल गुटखा किंमतीत वाढ आणि नकली विमल

आबा सूर्यवंशी

(जळगांव जिल्हा प्रतिनिधी)

पाचोरा शहरात शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात येणार असल्याची गोपनीय माहिती १ एप्रिल २०२५ मंगळवार रोजी पाचोरा पोलीसांना मिळाली होती.‌ मिळालेल्या माहितीच्या आधारे पाचोरा पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन वरखेडी नाक्यावर सापळा रचून भरधाव वेगाने जाणारे वाहन थांबवून त्या गाडीमध्ये ३० लाख ५४ हजार रुपये किंमतीचा ६८ गोण्यांमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला विमल नावाचा गुटखा, पानमसाला, तंबाखू सदृश्य पदार्थ आढळून आल्यावर चालकासह सदरचे वाहन जप्त करुन पाचोरा पोलीस स्टेशनला आणून वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला. संबंधित गुटखा तस्करला पाचोरा न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गुटखा तस्करचे रॅकेट सक्रीय

पाचोरा परिसर व संपूर्ण जिल्ह्यात ओळखला जाणारा गुटखा तस्कर ची आय.पी.सी. कलम १२३, २२३, २७४, १७५ सह अन्न, सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत गुन्ह्यातील कलमाखाली न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून तो जळगाव येथील कारागृहात बंदिस्त आहे. असे असले तरी पाचोरा, भडगाव शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात, वाड्या वस्त्यांवर आजही शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणात ठोक व किरकोळ विक्री दिवसाढवळ्या, राजरोसपणे सुरु आहे. विशेष म्हणजे पाचोरा शहरातील गुटखा किंगच्या रॅकेट मधील चौकडी या गुटखा वितरणाच्या कामात सक्रिय आहे.
*गुटखा विक्रीची नवी शक्कल*
पाचोरा पोलीसांनी गुटखाबंदी करण्यासाठी कंबर कसली असल्याने ही गुटखा वितरण करणाऱ्या चौकडीने नवीन शक्कल लढवून बाहेर गावाहून येणारा गुटखा पाचोरा शहराचे आसपासच्या शिवारात सुरक्षित गोडाऊन ठिकाणी उतरवून हा गुटखा धान्याच्या किंवा रासायनिक खतांच्या गोणीमध्ये भरुन पाचोरा, भडगाव शहरासह दोघेही तालुक्यातील खेड्यापाड्यातील किरकोळ विक्री करणाऱ्या गुटखा विक्रेत्यांच्या मागणीनुसार दुचाकीवरुन व खाजगी अलिशान चारचाकी वाहनातून घरपोच सेवा दिली जात असल्याचे समजते.?
*पाचोरा शहर तालुक्यात अचानक विमल गुटख्याचे भाव वाढले*
पाचोरा आणि परिसरात विमल गुटखा सप्लायर कोण ! हे सर्वांना माहिती आहे. सुमारे ३२ लाखांची गुटखा कार्यवाही झाल्या नंतर पाचोरा शहर व तालुक्यात विमल गुटखा किंमतीत वाढ झाल्याने पान टपऱ्या, किराणा दुकाने व अन्य ठिकाणांवर विमल गुटखा जादा दराने मिळत आहे.तसेच बाजारात आरोग्याला घातक असलेल्या नकली लालसर पडलेल्या विमल पुड्या बऱ्याच ठिकाणी मिळत आहे.
पोलिस प्रशासनाने पुन्हा मोहीम राबवावी
आजच्या परिस्थितीत पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहा .पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडून देत कायदा काय असतो हे दाखवून दिले, परंतु आजही पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर अवैध गुटख्याची विक्री सुरु असल्याने पोलिस प्रशासनाने पुन्हा गुटखा कार्यवाही राबवावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button