अखंड नाम, जप, यज्ञाने पाचोऱ्यात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त सप्ताहाची सांगता
Akhand Naam, Japa, Yajna Pachoryat Shri Swami Samarth Maharaj, on the occasion of his death anniversary, Saptachi Sangat
आबा सूर्यवंशी
( जळगांव जिल्हा प्रतिनिधी)-
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशिर्वादाने व परम पूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार २६ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त पाचोरा शहरातील संघवी काॅलनी स्थित दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रात अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहाचे आयोजन १९ एप्रिल पासुन करण्यात आले होते. १९ एप्रिल रोजी ग्रामदेवता मानसन्मान, मंडल मांडणी करण्यात आली असून २० एप्रिल रविवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने यजमान नंदकुमार शेलकर, प्रतिभा नंदकुमार शेलकर, यांच्या हस्ते मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन, नित्य स्वाहाकार, विसर्जन सेवा रुजू करण्यात आली. या सप्ताहाचे यशस्वीरित्या आयोजन हे केंद्र प्रमुख रेखा पाटील यांच्या सुक्ष्म नियोजनाने करण्यात आले होते. याप्रसंगी परिसरातील २०१ महिला, पुरुष, तरुण, तरुणी भागवत पारायणास बसले होते. याज्ञिकी विभागात पुजा विधी हे सुभाष श्रावण पाटील व गिरिष दुसाने यांनी यजमांनाकडुन विधीवत पुजन करुन घेतले. या सप्ताहात २१ एप्रिल सोमवार रोजी नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, २२ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार, चंडी याग, २३ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार, श्री स्वामी याग, २४ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार, गीताई याग, २५ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग, मल्हारी याग, शनिवार २६ एप्रिल रोजी नित्य स्वाहाकार बली पुर्णाहुती, श्री सत्य दत्त पुजा व देवता विसर्जनासह अखंड नाम, जप, यज्ञ यासह सकाळी ६ वाजेपासून सामुहिक वाचन करुन सप्ताहाची सांगता करण्यात आली. सलग सात दिवस चाललेल्या या अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताहात परिसरातील असंख्य सेवेकऱ्यांनी सहभागी होवुन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी सेवा रुजू केली. सप्ताह यशस्वीतेसाठी केंद्र प्रमुख रेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, पुरुष, तरुण, तरुणी यांनी दिवसरात्र अथक परिश्रम घेतले.