शेतकरीपुत्रांनी लग्नासाठी नवरी मिळावी म्हणून नोकरी साठी शहरांकडे जाऊ नये!:आमदार किशोर आप्पा पाटील
भावी पिढीने व्यावसायिक शेतीकडे वळावे आमदारांचे भावी पिढीला आवाहन!

(आबा सूर्यवंशी /महाराष्ट्र प्रतिनिधी)-
जळगांव/पाचोरा- येथे खरीप हंगाम पूर्व तयारी कार्यशाळा आणि खाजगी – सरकारी भागीदारी उपक्रम अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ), शेतकरी गट, शेतकरी उत्पादन कंपनी, खासगी कंपनी, सुक्ष्म सिंचन वितरक निविष्ठा वितरक यांच्या संयुक्त विद्यमाने आढावा सभा, क्षेत्रिय किसान गप्पा , संवाद कार्यक्रम आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेत गिरड रोडवरील तालुका फळरोप वाटिका येथे पार पडला. कार्यक्रमास बाजार समिती सभापती गणेश पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, प्रांताधिकारी भूषण अहिरे, कृषी अधीक्षक कुरबान तडवि, आदर्श शेतकरी रमेश बाफना, सुनील पाटील, अरुण पाटील,मयुर पाटील कृषी शास्त्रज्ञ हेमंत बाहेती, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कृषि विभागाचे श्री.चौधरी, श्री. मांडगे, कृषी अधीक्षक हेमंत चव्हाण,प्रविण ब्राम्हणे, स्विय सहाय्यक राजेश पाटील तसेच महसूल ,पंचायत समिती, कृषी सहाय्यक आदीं सह शेतकरी मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते . प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी खरीप हंगाम पूर्व तयारी, शेतकऱ्यांचे वर्षभरातील कामांचे नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान,कृषि विभाग शेतकऱ्यांसाठी केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून केलेली व आगामी काळात करणार असल्याची स्क्रीन वर माहिती आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
नवरी मिळविण्यासाठी नोकरी शोधण्यासाठी शहराकडे न जाता व्यावसायिक शेती करा. शेतकरी पुत्रांना आमदारांचे आवाहन
अध्यक्षीय भाषणात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भावी पिढी आणि आदर्श , प्रयोगशील शेतकऱ्यां कडून अपेक्षा, शेतकरी समस्या, उपाय योजना, उत्पादित मालाला हमीभाव, बाबत राज्य सरकार किती गंभीर आहे याची अनेक उदाहरणे दिली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला राज्य शासन हमी भाव देण्यासाठी कटिबद्ध असून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करताना काळानुसार व्यावसायिक शेती केली पाहिजे. शेतकरी पुत्र म्हणून आमदारांनी आजच्या तरुणांना आवाहन केले की, आपल्याला वडिलोपार्जित शेती असताना लग्नासाठी नवरी मिळविण्यासाठी मोठ्या शहरानमध्ये तुटपुंज्या पगाराची नोकरी शोधण्याच्या भानगडीत न पडता व्यावसायिक शेती करून शेती उत्पादनाची स्पर्धा करावी. खरीप हंगामाची पूर्व तयारी झाल्या नंतर शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता १५ मे अगोदर नव्हे तर जून महिन्यातच पेरण्या कराव्या. नवीन पिढीतील युवा शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि प्रयोगशील शेतकऱ्यांनी भावी पिढी शेतीकडे कशी वळवली जाईल या साठी त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.तसेच पाचोरा तालुका कृषी विभाग शेतकरी हिताच्या कामांचे व आयोजित कार्यक्रम बाबत कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. कृषि विभाग कडून बीज रोपण प्रात्यक्षिक आणि शेती मार्गदर्शन, शेती व्यवसाय, संबंधित विविध स्टॉल लावण्यात आले होते.



