दिलीप वाघ अखेर भाजपच्या गुहेत ! हातात कमळ ; मुखी जय श्रीराम! २७ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईला प्रवेश

(आबा सूर्यवंशी/महाराष्ट्र प्रतिनिधी) –

२०२४ ची विधानसभा निवडणुक सर्वच पक्षांसाठी त्या – त्या पक्षातील आजी, माजी आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासाठी प्रचंड अस्तित्वाच्या होती. विजयाची शंका व पराभवाच्या आशंकाच्या सावटात पाचोरा – भडगाव मतदार संघात अनेक नवखे , हौसे विधानसभा लढण्यासाठी गुडघ्याला बाशिंगे बांधून आखाड्यात उतरले होते. त्यातील काहींनी विविध कारणांनी माघारी घेऊन नांग्या टाकल्या तर काहींना अधिकृत पक्षांनि उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष तर काहींनी इतर पक्षांच्या उमेदवाऱ्या घेऊन विधानसभेची निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला. परंतु अतिशय प्रतिकूल आणि विचित्र राजकीय परिस्थितीत कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांनी विकासाच्या जोरावर आणि मतदारांच्या आशीर्वादाने सर्वांच्या अनामत जप्त करून तिसऱ्यांदा विजय संपादित करून हॅट्ट्रिक केली आणि जुने राजकीय सर्व रेकॉर्ड मोडून काढले.

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवात अनेकांची राजकीय वाताहत ?
या राजकीय वाताहतीत ओंकार आप्पांचे वारसदार माजी आमदार दिलीप वाघ यांना देखील मतदारांनी नाकारलेच नाही तर त्यांना आपली अनामत रक्कम देखील वाचविता आली नसल्याची दुर्दैवी वेळ त्यांच्या राजकीय वाटचालीत आली.
मतदार संघात राजकीय ध्रुवीकरणाची नांदी !
२०२४ च्या विधानसभा निवडणूक निकालनंतर मतदार संघात राजकीय ध्रुवीकरणाची रणनीती भाजपाकडून आखली जात आहे.राज्यात महायुती असली तरी पक्ष संघटन वाढविण्यासाठी आणि पुढच्या बेरजेच्या राजकीय खेळीसाठी भाजप पक्ष नेहमी सक्रिय असतो. वाघांचा भाजपा प्रवेश त्याची नांदी आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत व अनामती गमावलेल्यांचे काहींचे राजकीय अस्तित्व संपल्यात जमा झाले आहे ,तर काही पुढच्या काळात राजकीय उद्धाराची वाट पहात आहेत. या घडामोडीत मतदार संघाच्या राजकारणात राजकीय वजन, सतत जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले वाघ परिवार अपवाद आहेत. भविष्यात जनहित आणि स्वतः चे राजकीय अस्तिव टीकविण्यासाठी वाघ गटाने भाजपा जाण्याच्या निश्चयावर गांभीर्याने विचार केला आहे.

दिलीप वाघांच्या भाजपा प्रवेशाचे संकेत!
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्षातील माजी आमदार दिलीप वाघ हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशा वावड्या उठत आणि चर्चेत होत्याच.या बाबत दिलीप वाघ देखील होकार, नकारच्या गोलमाल भूमिका बजावत होते. परंतु दिलीप वाघांची तळ्यात मळ्यात भूमिका घेत असल्याने आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा स्थानिक पातळीवर दिलीप वाघांच्या प्रवेशाला सकारात्मक, आणि नकारात्मक भूमिका बजावणाऱ्या भूमिकेमुळे तसेच वरिष्ठ पातळीवरून प्रवेशाला हिरवा कंदील लवकर मिळत नसल्याने सुद्धा त्यांचे प्रवेशाचे घोंगडे भिजत पडले होते.परंतु वाघ भाजपावाशी होणार असे संकेत मिळत होते.

अखेर वाघ भाजपाच्या गुहेत
दिलीप वाघांच्या भाजपा राजकीय प्रवेशाचे भिजत घोंगडे अखेर सुकले असून आणि वाघ गट भाजपा वाशी होण्याच्या सर्व प्रक्रिया पार पडल्या असल्याने दिनांक २७ मे रोजी दिलीप वाघ हे आपल्या समर्थकांसह मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असून ते आणि त्यांचे कार्यकर्ते आता या पुढे मतदार संघात भाजपाचे हातात कमळ घेऊन जय श्रीरामचा जयघोष करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button