जळगाव:भडगाव: शारदा बागुल खून प्रकरणी ६ जून रोजी आक्रोश मोर्चा!
Jalgaon: Bhadgaon: Protest march on June 6 in the Sharda Bagul murder case!
प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी)भडगाव तालुक्यातील कै. शारदा उर्फ पूजा बागुल (माळी) यांच्या क्रूर खुनाच्या निषेधार्थ उद्या, शुक्रवार, ६ जून २०२५ रोजी सकाळी ९ वाजता भडगाव येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २९ मे २०२५ रोजी शारदा यांचा पती, नणंद, सासू, सासरे आणि इतर संशयितांनी धुळे येथे अमानुष मारहाण करून त्यांचा खून केल्याचा आरोप आहे. या अमानवीय कृत्याविरोधात संतापलेल्या भडगावकरांनी एकत्र येऊन हा आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मोर्चा भडगाव नगरपरिषदेजवळील बाजार चौकापासून सुरू होऊन तहसील कार्यालयापर्यंत जाणार आहे. शारदा यांना त्वरित न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी समस्त भडगावकरांना कुटुंबासह मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली असून, समाजातील माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा कृत्यांविरुद्ध एकजुटीने आवाज उठवण्याचा निर्धार भडगावकरांनी व्यक्त केला आहे. सर्व नागरिकांना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शारदा यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.