छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर महाविकास आघाडीचे मूक आंदोलन
कराड विद्या मोरे : बदलापूरच्या चिमुकल्यांवरील अत्याचार आणि महाराष्ट्रात महिलांवर वाढत चाललेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुन्हेगारीला प्रवृत्त करणाऱ्या आणि गुन्हेगारांची पाठराखण करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात कराड शहरात मूक आंदोलन करून निषेध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंद मागे घेत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. तरीसुद्धा आज महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी महाराष्ट्रभर सरकारविरोधात निषेध आंदोलन केलं. या अनुषंगाने आज कराड मध्ये सुद्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी मधील कराड तालुक्यातील नेत्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ एकत्र येऊन तोंडावर काळ्या फीत लावून आंदोलन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख नितीन काशीद, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण, शिवसेना कराड शहर उपाध्यक्ष शेखर बर्गे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता जाधव, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, मलकापूर माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, गीतांजली थोरात, कराड दक्षिण युवक काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील कराडचे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष मोहनराव शिंगाडे, दिग्विजय सूर्यवंशी आदिसह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून, हातात काळे झेंडे घेत, मौन व्रत धारण करीत ही मूक निदर्शने आज करण्यात आली. अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. संतप्त झालेल्या बदलापूरकरांनी उत्स्फूर्त आंदोलन करीत रेल्वे स्थानकात रेल रोको करून या घटनेतील गुन्हेगारांवर कारवाईची मागणी लावून धरली. त्यांच्या या आंदाेलनास पाठिंबा देऊन घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांसह अन्यही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येत आज कराड शहरात मूक निदर्शने करून निषेध व्यक्त केला.