कराडमध्ये आज पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली
कराड – पियुष गोर.
आज गुरुवार, दि. २६ डिसेंबर रोजी अभिरुची हॉल, कऱ्हाड येथे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी ह्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लावली होती. अभिरुची, संस्कृती मंच, कऱ्हाड जिमखाना आणि स्वरनिर्झर ह्या कऱ्हाडमधील शास्त्रीय संगीताशी निगडित संस्थेचे प्रतिनिधी म्हणून डॉ. अजय ब्रह्मनाळकर, गौरी ताम्हणकर, दिलीप आगाशे, कुमार शाह आणि आलापिनी जोशी यांनी उ.झाकीर हुसेन यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. पं. नयन घोष यांचे शिष्य चैतन्य देशपांडे यांनी प्रास्ताविक केले आणि त्यानंतर उ. झाकीर हुसेन यांचे गुणवैशिष्ट्य व व्यक्तिमत्व दाखवणारी ध्वनिचित्रफीत प्रदर्शित केली. त्यानंतर पं.सुरेशजी तळवलकर यांनी उ.झाकीर हुसेन यांच्या तबलावादनाची तसेच त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगितली, त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला तसेच झाकीर हुसेन यांच्या संगीतक्षेत्रावर असलेल्या प्रभावाचा तसेच कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. ह्या श्रद्धांजली सभेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदर्श कलाकार कसा असावा याचेही मार्गदर्शन पं सुरेशजी यांनी केले आणि उ. झाकीर हुसेन हे आदर्श कलाकाराचे उदाहरण असल्याचे नमूद केले.
ह्या श्रद्धांजली सभेचे आयोजन ऍड.चैतन्य देशपांडे, डॉ. अजय ब्रह्मनाळकर आणि कुमार शाह यांनी केले होते. कऱ्हाड संगीत प्रेमी रसिकानीं ह्या कार्यक्रमास भरभरून उपस्थिती लावली व तालयोगी पद्मश्री सुरेशजी तळवलकर व कर्हाडकरांनी उ.झाकीर हुसेन यांस श्रद्धांजली वाहिली.प्रकाशबापू पाटील, डॉ.अनिरुद्ध दीक्षित इ. मान्यवरांनी श्रद्धांजली सभेस उपस्थिती लावली.