जन्मदात्यांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ का येते. आबा सूर्यवंशी
जन्मदात्यांना वृद्धाश्रमात जाण्याची वेळ का येते. आबा सूर्यवंशी
आजच्या पिढीने विचार करावा!
आभाळमाया वृद्धाश्रम पुणे येथे मातृदिन साजरा .
(महाराष्ट्र प्रतिनिधी)
पाचोरा येथील सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल देशमुख व इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा सौ. निर्मलाताई देशमुख यांची कन्या डॉ.अपर्णा देशमुख ह्या गेल्या १४ वर्षांपासून बिकट परिस्थितीवर मात करून, प्रचंड परिश्रम घेऊन पुणे नगरीत आभाळमाया वृद्धाश्रम चालवीत आहे. या कालावधीत त्यांनी सुमारे पाच हजार विविध वयोगटातील अनाथ, निराधार वृद्ध महिला पुरुषांना आश्रमात आणून त्यांना आधार देणे, त्यांच्या व्याधींवर मोफत ऑपरेशन, वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य करीत आहे .त्यांच्या या वृद्धसेवेची दखल घेत त्यांना आतापावेतो अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
दि.११ मे रविवार रोजी आभाळमाया वृद्धाश्रमात जागतिक मातृदिन आणि थोरसमाज सेवक बिंदू माधव जोशी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी पाचोरा येथील परंतु पुणे नगरीत स्थायिक झालेले संगीत क्षेत्रात नावलौकिक असलेले राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित, संगीतशिक्षक सुरमणी डॉ. सुधाकरजी तळणीकर, पाचोरा येथील सुप्रसिद्ध कलाकार, पत्रकार, आयडियल पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख आबासाहेब लक्ष्मण सूर्यवंशी, रुद्राक्ष इंटरप्राइजेस चे संचालक नितीन सिनकर (आयडियल पत्रकार संघटनेचे पुणे अध्यक्ष) डॉ.अनिलराव देशमुख, सौ.निर्मलाताई देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मातृशक्तीला स्मरण करून ग्राहकतीर्थ,ग्राहक कायदा, हक्क आणि कर्तव्याचे प्रबोधकार बिंदूमाधव जोशी यांच्या १० स्मृती दिनानित्त प्रतिमेला वंदन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रमुख अतिथींची ओळख आणि त्यांच्या कार्याची माहिती डॉ.अनिल देशमुख यांनी दिली. तर प्रास्ताविकात आभाळमाया वृद्धाश्रम अध्यक्षा डॉ. अपर्णा देशमुख यांनी वृद्धाश्रम सुरू करण्या पासून ते आज पर्यंतच्या वाटचालीत सामाजिक बंधणे, आर्थिक अडचणी, बरे ,वाईट अनुभव अत्यंत भावनिक शब्दात कथन केले.
या छोटेखानी कार्यक्रमात *सुरमणी डॉ. सुधाकर तळणीकर* यांनी आजच्या नव्या पिढीकडून वृद्धांना घरात मिळत असलेल्या वागणुकी बद्दल चिंता व्यक्त करून कौटुंबिक परिस्थिवर अनेक उदाहरणे दिली.
*कलाकार, पत्रकार आबासाहेब सूर्यवंशी* वृद्धाश्रमातील निराधारांशी संवाद साधत म्हणाले की, ज्यांनी जन्माला घातले, असेल त्या परिस्थितीत मुलांना लहानाचे मोठे केले, शिक्षण देऊन त्यांना पायावर उभे केले तीच अपत्ये जेव्हा आई वडिलांना खरा आधार, सांभाळ करण्याची वेळ असते तेव्हा कर्तव्ये विसरून आपल्या जन्मदात्यांना वृद्धाश्रमात राहण्याची दुर्दैवी वेळ आणतात. या प्रकारांमध्ये उच्च शिक्षित, उच्चपदांवर असलेली काही अपत्ये माणुसकीला काळीमा लावतात. वृद्धाश्रम असूच नये ,वृद्धाश्रम निर्मितीची वेळ का येते हे आजच्या पिढीतील मुलगा, मुलगी, सुनांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आपलीच अपत्ये जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडून देतात तेव्हा त्या निराधारांना आधार देण्याचे कार्य करणाऱ्या डॉ.अपर्णा देशमुख सारख्या रणरागिणी सामाजिक बांधणे झुगारून, आपल्या भावी जीवनातील स्वप्नांचा त्याग करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जेव्हा वृद्धाश्रमात हजारो निराधार,अनेक व्याधींनीपीडित लोकांना आधार देण्यासाठी पुढे येत असतात. विविध वयोगटातील, काहींची तर कोणतीच माहिती नसते, त्यांचा धर्म,जात, पात, नाव, पत्ता माहित नसतो तरी अशा निराधारांना आपल्या आभाळमाया वृद्धाश्रमात माया ,ममता, लावून त्यांना वात्सल्याचा सावलीत ठेवून त्यांचे पालन पोषण करतात, स्वतः ला अश्या कार्यात अर्पण करून घेतात हे काम असामान्य आहे.