आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी

Navi Mumbai Municipal Corporation

नवी मुंबई महानगरपालिका

प्रसिध्दीकरिता

मागील तीन दिवसांपासून सुरु असलेला पर्जन्यवृष्टीचा जोर दि. 17 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीपासून अधिक वाढला असून नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा नमुंमपा आयुक्त यांच्या निर्देशानुसार दक्षतेने कार्यरत असल्याने नवी मुंबईत कोठेही अडचणीचा प्रसंग उद्भभवलेला नाही. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नवी मुंबईत विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देत परिस्थितीची पाहणी केली व आवश्यक सूचना दिल्या.

17 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 18 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 पर्यंत नवी मुंबई क्षेत्रात 115.17 मिमी पावसाची नोंद झालेली असून सकाळी 8.30 पासून सायं. 5.30 पर्यंत सरासरी 83.68 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.

त्यापुर्वी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 134.68 मिमी. आणि 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 17 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 105.70 मिमी. पावसाची नोंद झालेली आहे.

नवी मुंबई हे शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने अतिवृष्टी व भरती एकाच वेळी
असल्यास शहरातील काही अतिसखल भागात काही प्रमाणात पाणी साचते, मात्र ओहोटी सुरु झाल्यानंतर या पाण्याचा निचरा होतो. त्या अनुषंगाने आयुक्तांनी शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड यांच्यासमवेत प्राधान्याने समुद्राकाठी असणा-या वाशीगाव व परिसराची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शहरातील इतर भागांनाही भेटी देत तेथील स्थितीची पाहणी केली.

*उद्या 19 ऑगस्ट रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी*

खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना आज 18 ऑगस्ट रोजी दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली, तसेच शाळांमध्ये आलेली मुले सुखरुप घरी जातील याची दक्षता व काळजी घेण्याचे निर्देश शाळा व्यवस्थापनांना देण्यात आले. उद्या 19 ऑगस्ट रोजीही भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला असल्याने दोन्ही सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.

से.21, एपीएमसी मार्केट रस्ता तसेच सानपाडा – जुईनगर येथील अंडरपास, से 5 आणि से 7 ऐरोली येथील अष्टदर्शन सोसायटी समोरील रस्ता अशा ठिकाणी काही काळ पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तेथे जादा पाणी उपसा पंप कार्यान्वित करण्यात आले. तसेच त्याठिकाणच्या रस्ते व गटार यामधील वॉटरएन्ट्रीवर जमा झालेले अडथळे दूर करून साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करुन देण्यात आली. एमआयडीसी क्षेत्रातही रबाळे भागात पाणी उपसा पंपाव्दारे रस्त्यावर साचलेले पाणी काढून टाकण्यात आले. पावसाची संततधार सुरू असल्याने वाहतुक सकाळी व दुपारी वाहतुक मंद गतीने सुरू होती.

भारतीय हवामानशास्त्र विभागामार्फत ठाणे जिल्ह्याला 18 व 19 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून 20 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेसह महापालिका क्षेत्रातील इतरही प्राधिकरणांना दक्ष राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले असून विशेषत्वाने अतिवृष्टी व भरतीच्या काळात नवी मुंबईच्या भौगोलिक स्थितीमुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असणा-या संभाव्य ठिकाणी आवश्यक यंत्रसामुग्री व यंत्रणा अधिक कृतीशीलतेने दक्ष राहतील याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

मागील 3 दिवस प्रत्येक दिवशी दररोज सरासरी 100 ते 125 मिमी पर्जन्यवृष्टी होऊनही इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबई शहरातील जनजीवन सुस्थितीत आहे. नवी मुंबई महानगरपालिका मदतकार्यासाठी सज्ज असून नवी मुंबईकर नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता व घाबरुन न जाता कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास मदत कार्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नजिकच्या विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्षाशी अथवा महानगरपालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी 27567060 / 27567061 या क्रमांकावर अथवा 1800222309 /2310 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button