पाचोऱ्यातील सु.भा. पाटील शाळेत वर्गातच शिक्षकाची आत्महत्या!
पाचोरा, प्रतिनिधी (आबा सूर्यवंशी )- पाचोरा शहरातील व्ही पी. रोडवरील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित सुपडू भादू पाटील विद्या मंदिर शाळेत इयत्ता ४ थी वर्ग शिकविणारे, संस्थेत कार्यरत शिक्षक रवींद्र भारत महाले ( वय ४८) मूळ राहणार दहीगाव संत ता.पाचोरा. ह.मु.आशीर्वाद ड्रीमसिटी पाचोरा हे आज दिनांक २६ बुधवार रोजी सकाळी नेहमी प्रमाणे शाळेत शिकविण्यासाठी आले होते. मात्र त्यांनी मधल्या सुटी दरम्यान शाळेच्या तिसऱ्या मजल्या वरील वर्गात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. सदरची घटना समजल्या नंतर एकच धावपळ उडाली. पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक पवार, सहायक पोलीस निरीक्षक श्री. निकुंभ,उपनिरीक्षक श्री. घायाळ, पोलीस हवालदार योगेश पाटील,पो. कर्मचारी हरीश परदेशी, संतोष राजपूत, वाहनचालक संभाजी पाटील तातडीने घटनास्थळी पोहोचले. मयत शिक्षकाला गळफासाच्या अवस्थेतून खाली उतरवून प्राथमिक स्वरूपात पंचनामा केल्या नंतर मयत शिक्षकाचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन साठी पाठविण्यात आला. मयत शिक्षक रवींद्र महाले यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकलेले नाही. पुढील तपास पाचोरा पोलिस निरीक्षक श्री. पवार यांचे मार्गदर्शनात तपासी अंमलदार करीत आहेत.