अनधिकृत कॉल सेंटर चालवून परदेशीय नागरीकांची फसवणूक करणारी टोळी गजाआड
वाडा (सुधाकर भोईर ):- वाडा तालुक्यातील नाणे गावच्या हद्दीतील मेगाविला या रहिवाशी प्रकल्पातील एका इमारतीमध्ये अनधिकृत बोगस कॉल सेंटर चालवीणाऱ्या 23 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाणे येथील मेगाविला प्रोजेक्टमधील एका इमारतीममध्ये पोलिसांनी छापा टाकला असता एकुण ६ फ्लॅटमध्ये एकूण २३ आरोपी त्यांचे इतर साथीदार हे अनधिकृत कॉल सेंटर चालवीत असल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी चौकशी केली असता सदर आरोपी हे आपसात संगणमत करुन लॅपटॉप व मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करुन x-lite, eyebeam, x-ten या अॅप्सचा वापर करून कॅनडा येथील नागरीकांचा मोबाईल फोन नंबर नाव व इतर माहिती बेकायदेशिररित्या प्राप्त करुन, संबंधितांना आपण अमेझॉन ऍप्सवर ऑर्डर न केलेल्या वस्तु, साहित्य, गिफ्ट्स किंवा इतर महागड्या वस्तु या ऑर्डर केल्याचे भासवुन, सदरची ऑर्डर रद्द करण्यासाठी आपण १ प्रेस करा असा सल्ला देत असत. संबंधितांनी १ नंबर प्रेस केल्यास बोगस कॉल सेंटरला संबंधित व्यक्तीचा फोन कनेक्ट होत असे. सदरचा फोन कनेक्ट झाल्यास आरोपीस इसम हे त्यांना लिहून दिलेल्या स्क्रिप्ट नुसार त्या व्यक्तीशी बोलत असत व त्यानुसार संबंधित व्यक्तीकडुन माहिती घेऊन संबंधितांनी टाळाटाळ केल्यास तुमचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा रोबोटीक कॉल / व्हाईस कॉल करुन त्यांना घाबरवून त्यांचेकडुन बिटकॉईन वॉलेट मार्फत काही रक्कम देण्यास भाग पाडले जात असत. अशा प्रकारे आरोपीनी वरील ऍप्सचा चा वापर करून कॅनडा व इतर देशातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक केलेली आहे.
सदर माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या आधारे जव्हारचे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, वाड्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस ठाणे यांना पोलीस पथक तयार करून नमूद ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलिसांनी एक पथक तयार करून दिनांक १४ जुलै रोजी रात्रौ १२.०० वाजता सदर 23 आरोपी त्यांचे इतर साथीदारांना रंगेहात मुद्देमालासह अटक केली असून त्यांचेविरूध्द वाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २७५/२०२३ भा.द.वि.स. कलम ४२०, ४१९, १२० (ब) १८८, २०१, ३४ सह माहिती तंत्रज्ञान कायदा सन २००० चे कलम ४३, ६६ (डी), ६६, ७५ सह भारतीय बिनतारी तारायंत्र अधिनियम १९३३ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोनि / अनिल विभुते, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.