पाचोरा – जारगाव हद्दीत घरफोडी!,रोकड सह एक लाखांचे सोने -चांदीचे ऐवज चोरी
आबा सूर्यवंशी
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी )
पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरातील १ लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने व ३७ हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून प्राप्त माहिती नुसार सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे सिद्धीविनायक नगर, नाथमंदिर समोर, जारगाव ता. पाचोरा येथे घर आहे. सुभाष मोरे हे लग्न समारंभासाठी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता पत्नीसह छत्रपती संभाजी नगर येथे गेले होते. दरम्यान २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजता सुभाष मोरे हे घरी आले असता घराच्या बाहेर असलेल्या चप्पल स्टॅण्ड वर घराचे कुलूप पडलेले होते. व घराचा कडी कोंडा तुटलेला होता. सुभाष मोरे यांनी घरात प्रवेश केला असता सर्व सामान अस्ताव्यस्त असलेला दिसला. सुभाष मोरे यांनी घरातील कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ४० हजार रुपये किंमतीच्या प्रत्येकी ८ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजार रुपये किंमतीचे चांदीची समई, अगरबत्ती स्टॅण्ड, ताटली, लक्ष्मीचे काॅईन यासह ३७ हजार रुपये रोख असा १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. सुभाष मोरे यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे हे करीत आहे.