पाचोरा येथील इस्कॉन मंदिरात श्री जगन्नाथ रथयात्रा उत्साहात संपन्न
Shri Jagannath Rath Yatra concludes with enthusiasm at ISKCON temple in Pachora
पाचोरा, प्रतिनिधी – आबा सूर्यवंशी
श्रीजगन्नाथ रथयात्रा ही जगातील एक अतिप्राचीन आणि पवित्र धार्मिक परंपरा असून तिचा मुख्य उत्सव ओडिशातील पुरी येथे दरवर्षी आषाढ शुद्ध द्वितीयेला साजरा होतो. भगवान श्रीजगन्नाथ, बलभद्र व सुभद्रामाई यांची भव्य रथात बसवून नगरभ्रमण करण्याची ही परंपरा आहे. जे भाविक पुरीला प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी जगभरातील इस्कॉन मंदिरांमार्फत रथयात्रा साजरी केली जाते.
या परंपरेचा भाग म्हणून पाचोरा शहरापासून दहा की.मी. वर असलेल्या इस्कॉन मंदिराच्या वतीने भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
वाद्यांच्या गजरात आणि ‘हरे कृष्णा हरे राम’ च्या मंत्रोच्चारात हजारो भाविकांनी रथ ओढला.रथ मार्ग फुलांनी सजवले होते. या रथयात्रेला जळगाव, भडगाव, धरणगाव, चाळीसगावसह भाविक आले होते.पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सहपत्नी सहभाग घेत रथ ओढण्याचा भक्तिपूर्ण आनंद घेतला. पार्थ सारथी प्रभुजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले प्रवचन भावनिक आणि अंतःस्पर्शी होते. त्यांच्या सोबत चैतन्य जीवन प्रभुजी, उत्तम मोहन प्रभुजी, आदित्य वामन प्रभुजी, रघुनाथ श्याम प्रभुजी, मनोज प्रभुजी, श्याम प्रभुजी, हर्षल प्रभुजी, भक्तावर प्रभुजी, पंकज प्रभुजी, माधवदास प्रभुजी, रामचरित्र प्रभुजी, भजन गौरंग प्रभुजी, सर्वशक्तिमान प्रभुजी आणि अनेक इतर मान्यवरही उपस्थित होते.
यावेळी पाचोरा शहरातील वारकरी, भवानी येथील शाळेचे विद्यार्थी टाळ-मृदुंगांसह पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. त्यांनी भजन-नामस्मरणाच्या माध्यमातून वातावरण अधिक भक्तिमय केले.
यात्रेनंतर मंदिरात ५६ भोग अर्पण करण्यात आले. मिठाई, फराळ, खिचडी, वडे, पोळी, पुलाव, फळे अशा शेकडो नैवेद्य थाळ्यांनी सजलेला प्रसाद भोग ठेवण्यात आले होते. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले.हजारो भक्तांच्या उपस्थितीत रथ यात्रा शांततेत साजरी करण्यात आली.