अमळनेर कोर्ट आवारात साक्षीदाराने केली वकिलाला मारहाण,पाचोरा लॉयर्स असोसिएशन तर्फे निषेध!,सरकारने ॲड. प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्याची मागणी

-: आबा सूर्यवंशी :-
(जळगांव जिल्हा प्रतिनिधि)
पाचोरा – दिनांक ४ मार्च रोजी अमळनेर येथे कोर्टात उलट तपासणी करणारे अ‍ॅड. प्रशांत बडगुजर यांनी साक्षीदाराला विचारलेल्या प्रश्नाचा राग आल्याने संबंधित साक्षीदाराने न्यायालयाच्या आवारातच अ‍ॅड. बडगुजर यांना मारहाण केली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि निषेहास्पद आहे. दि पाचोरा लॉयर्स असोसिएशनचे सर्व सदस्य वकील बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ दिनांक १० मार्च २०२५ सोमवार रोजी पाचोरा येथील सर्व वकील बांधवांनी दुपारच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला. तसेच दुपारी २ वाजता पाचोरा न्यायालयाच्या प्रवेशद्वारा समोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. वकील सुरक्षेसाठी सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात! .या घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने त्वरित “अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन कायदा” लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच वकिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वकिलांच्या विरोधात अन्यायकारक कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करून लादले जाणार नाहीत, याची खात्री सरकारने द्यावी, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.
न्यायसंस्थेचा एक महत्त्वाचा घटक असलेल्या वकिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे सरकारने त्वरित ठोस पावले उचलावीत आणि वकिलांच्या संरक्षणासाठी आवश्यक कायदे लागू करावे अशी मागणी दि पाचोरा लॉयर्स असोसिएशन तर्फे करण्यात आली आहे. निषेध व्यक्त प्रसंगी पाचोरा न्यायालयाचे सर्व वकिल बांधव उपस्थित होते.

Related Articles

Back to top button