इस्कॉन मंदिरात “आम ” महोत्सव उत्साहात संपन्न
"Aam" festival concludes with enthusiasm at ISKCON temple
पाचोरा ( आबा सूर्यवंशी) श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिर, पाचोरा यांच्या वतीने ‘आम महोत्सव व गजावतार वेश दर्शन’ या विशेष भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात हरिनाम संकीर्तनाने झाली. त्यानंतर श्रीमान चैतन्य जीवन प्रभुजी यांनी आपल्या प्रवचनातून भागवत पुराणातील गजावतार कथा सादर केली. गजेंद्र हत्ती व मगरीची कथा सांगताना प्रभुजींनी सांगितले.गजेंद्र संकटात असताना आपल्या पूर्ण सामर्थ्याने झुंज दिली, पण अखेरीस जेव्हा तो ईश्वराच्या चरणी संपूर्ण शरण गेला, तेव्हाच भगवंत प्रकट झाले. ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठं असो, भगवंतावर विश्वास ठेवून भक्तीपूर्ण भावाने शरण जावं, तेव्हाच खरा उद्धार होतो.
चैतन्य जीवन प्रभुजींनी आपल्या प्रवचनात आंब्याचे भक्तिमूल्य देखील उलगडले. त्यांनी सांगितले की, “आंबा फक्त फळ नाही, तर तो भक्तीचा प्रतीक आहे. जसा आंबा रसपूर्ण, गोड आणि परिपक्व असतो, तशीच भक्तीही रसयुक्त, गोड बोलणारी आणि अनुभवांनी भरलेली असावी. श्रीकृष्णाला प्रिय असलेला आंबा भक्तांच्या हृदयातही गोडी निर्माण करतो. कार्यक्रमात गजावताराचा सुंदर वेश साकारण्यात आला होता. ज्याचे दर्शन घेण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने गर्दी केली. सजीव वेशामधून गजेंद्राची कळकळ आणि भगवंताचा पराक्रम उभा राहिला, ज्यामुळे अनेकांनी भावूक होऊन टाळ्यांनी वाजवून आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर सर्व भाविकांसाठी श्री जगन्नाथ प्रभूंच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः आंब्याचे विविध पदार्थ, आमरस आणि पारंपरिक अन्नाने सर्व भक्त तृप्त झाले. भक्तिमय महोत्सवाचे आयोजन श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिर, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे सेवेकरी, युवा मंडळ, महिला मंडळ व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात पाचोऱ्यासह परिसरातील अनेक भक्त, ज्येष्ठ नागरिक, महिला व युवांची उपस्थिती होती.