गोरडखेडा येथील हातमजुरी करणारी युवती झाली पोलीस शिपाई,जिद्द व चिकाटीच्या जोरावर मिळविले यश !
आबा सूर्यवंशी (जळगांव जिल्हा प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील घरकाम व हातमजुरी करणाऱ्या युवतीने मेहनतीच्या जोरावर यशाचा पल्ला गाठत थेट पोलिस शिपाई होण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे. वडिल हातमजुरी तर भाऊ पुस्तकाच्या दुकानावर मजुरी करुन आपल्या परिवाराचा गाडा चालवित आहे. वडिलांची व भावाची मेहनत बघुन तरुणीने जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले ध्येय गाठत नायगाव पोलिस भरतीत उत्कृष्ट कामगिरी करत पोलिस शिपाई पदावर नियुक्त झाली आहे. पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील रहिवासी आबा कोळी यांची मुलगी निकिता हिने लहान पणापासून पोलिस दलात भरती होण्याची जिद्द मनात बाळगली होती. एम.एम. महाविद्यालयात शिक्षणासाठी पहाटे सहा वाजता घरुन निघुन एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणावर सलग दोन तास शारिरीक श्रम निकीता कोळी हिचा नित्य नियम असायचा. सन – २०२२ / २०२३ मध्ये नायगाव (मुंबई) येथे पोलिस शिपाई पदाची भरती निकिता हिने अटेंड करत या भरती प्रक्रियेत यश संपादन केले. तिच्या या यशात पाचोरा येथील स्वराज कॅरीयर अकॅडमी चे संचालक स्वप्निल मराठे, जि प. शिक्षक रावसाहेब पाटील सुभाष देवरे, दिपक धनगर यांची मोलाचे मार्गदर्शन लाभले. निकिता कोळी हिने मिळविलेल्या यशाबद्दल पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी पोलीस ठाण्यात तिचा सत्कार करून भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी गोराडखेडा खुर्द सरपंच मनोज आप्पा उत्तमराव पाटील, पत्रकार नंदकुमार शेलकर, प्रविण बोरसे, दिलीप परदेशी जावीद शेख उपस्थित होते.